सांस्कृतिक कार्य विभाग,मंत्रालय
सांस्कृतिक कार्य विभाग हा महाराष्ट्र राज्याचा एक विभाग असून, मा.मंत्री (सांस्कृतिक कार्य) हे सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रभारी मंत्री आहेत. प्रशासकीय पातळीवर प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य) हे सांस्कृतिक कार्य उप विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. सांस्कृतिक कार्य उप विभागाच्या अधिनस्त एकूण 7 क्षेत्रिय कार्यालये व 2 महामंडळे कार्यरत आहेत. राज्यात अनेक ऐतिहासिक स्मारके, गडकिल्ले, मंदिर, थोर पुरुषांची जन्मघरे/ वाडे, मस्जिद व दर्गा अशी एकूण 386 राज्य संरक्षित स्मारके असून त्यांचे संरक्षण, जतन व संगोपन, राज्यातील 13 वस्तु संग्रहालयांमध्ये जतन करून ठेवण्यात आलेल्या प्राचीन व दुर्मिळ कलाकृती व रंगचित्रे अशा दुर्मिळ ठेव्याचे जतन करून पुढील पिढीसाठी या ऐतिहासिक वारशांचे जतन व संवर्धन करुन हा वारसा भविष्यासाठी जपून ठेवणे, हे अत्यंत महत्वाचे कार्य सांस्कृतिक कार्य उपविभागाकडे सोपविलेले आहे. आपला समग्र सांस्कृतिक , ऐतिहासिक वारसा जाणून घेण्यासाठी शिलालेख, ताम्रपट, हस्तलिखिते तसेच इतर महत्वपूर्ण कागदपत्रे यांचे संकलन व संशोधन होणे आवश्यक असते. यादृष्टीने सांस्कृतिक कार्य उपविभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्व व वस्तुसंग्रहालये, पुराभिलेख संचालनालय, दार्शनिका ही क्षेत्रिय कार्यालये कार्य करत आहेत.राज्यातील कलावंतांसाठी विविध योजना राबविणे, कलाक्षेत्राची, साहित्य क्षेत्राची निरंतर प्रगती होत राहून सांस्कृतिक वारसा समृध्द होण्यासाठी चालना देण्यासाठी पु.ल.देशपांडे कला अकादमी, रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ,सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य हिंदी, सिंधी, गुजराती अकादमी ही क्षेत्रिय कार्यालये कार्यरत आहेत. तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरी, कोल्हापूर चित्रनगरी महामंडळ ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालून देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मानसन्मान मिळवून देणारी महामंडळेही सांस्कृतिक कार्य उप विभागाच्या अधिनस्त कार्यरत आहेत. या सर्व कायालयांचे तसेच महामंडळांचे मंत्रालयीन स्तरावरील कामकाजाचे नियंत्रण, समन्वयन सांस्कृतिक कार्य उपविभागाकडून करण्यात येते. https://cultural.maharashtra.gov.in/